कथा ५० वर्षाची तपश्चर्या नाकारलेल्या फकीराची !

एक फकीर 50 वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्या कानी पडला,'' हे फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.''
फकीराच्या शेजारी बसणा-या इतर सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50 वर्षाची तप:श्चर्या निष्फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार करत असतानाच एक आश्चर्यचकित घडणारी घटना तेथे घडू लागली. ज्या फकीराबाबत ही आकाशवाणी घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता.
तो अल्लाचे आभार मानत होता आणि अल्ला, अल्ला, या खुदा तेरा शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या फकीराच्या मनावर खूपच परिणाम झाला आहे. हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्यांना वाटले. कोणीतरी त्या फकीराला विचारले,''बाबा, तुम्हाला खरे तर दु:ख व्हायला हवे होते. कारण तुमची 50 वर्षाची तप:श्चर्या आताच खुदाने नाकारली आहे.
तरी पण तुम्ही इतके आनंदात कसे'' फकीर आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50 वर्षाची तप:श्चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50 वर्षे झाले त्याचे स्मरण करतो आहे. त्याला माझे या निमित्ताने का होईना स्मरण झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.''
लक्षात ठेवा
कोणतीही सेवा ही निष्फळ होत नाही, यथायोग्य वेळेस त्याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही.