फायदेशीर कुकिंग टिप्स - चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना..
चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना..
१. पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी.
२. साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही. मध्यमवयीन पालव्याचं मटन सर्वोत्कृष्ट असतं.
कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही.
३. थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.
४. मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते.
मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.
आमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे.
५. सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.
६. मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.)
७. काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा.
८. चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते. चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.
९. जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं.
१०. घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते. चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे.
११. लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही.
१२. लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा. मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.
तळटीप: मोठ्या प्रमाणात मटन घरी आणण्याची तयारी असल्यास घरी येऊन प्रात्यक्षिक दिले जाईल.
मटन बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते पण मटन तिखटजाळचं चांगलं.
तळटीप: चांगलं मटन विकत आणता येतं, आणि वेळ पडल्यास बनवता ही येतं ही गोष्ट स्किल म्हणून लग्नाच्या प्रोफाइलमध्ये लिहिण्यासारखी आहे अशी आमची धारणा आहे.